विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (युनिट क्र. बी-०३१) विभागाच्या वतीने दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी “भारतीय संविधान जागृती” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आल्याची माहिती कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यक्रम अधिकारी डॉ.महेंद्र कोरडे यांनी दिली.
महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतीय संविधान अमृत महोत्सवानिमित्त जुन्नर शहरात संविधान जागृती रॅलीद्वारे कार्यशाळेची सुरुवात झाली. संविधान जागृती साठी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात स्वयंसेवकांनी संविधानाचे महत्व व लोकशाही यावर भाष्य करणारे पथनाट्य सादर करत लोकांमध्ये संविधान जागृती साठी प्रयत्न केला. “संविधान जागृती” कार्यशाळेचे उद्घाटन जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री.निवृत्ती काळे यांनी केले. उद्घाटन प्रसंगी बोलताना भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नाही तर देशाच्या आत्म्याचे प्रतिबिंब आहे.आपले संविधान केवळ मूलभूत अधिकारच देत नाही तर मूलभूत कर्तव्यांची जाणीवही करून देते असे प्रतिपादन केले. या कार्यशाळेत प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा.श्री.नारायण देशपांडे यांनी संविधानाचा ऐतिहासिक आढावा घेतला. संविधान समजून सांगताना त्यांनी आपल्या प्रभावी व्याख्यानात ७५ वर्षांपूर्वी पासूनचा इतिहास विद्यार्थ्यापुढे मांडला.१९४६ मध्ये मसुदा समितीची स्थापना, समितीच्या बैठका व बैठकीत मांडले गेलेले विविध अभ्यासकांचे विचार यांचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला.
“संविधान जागृती” कार्यशाळेत निरीक्षक म्हणून श्री.सुमित ढोरे, सदस्य,आधीसभा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे यांनी काम पाहिले.भारत हा विविध धर्म,संस्कृती,भाषा,आणि विचारधारांनी समृद्ध देश असूनही या विविधतेत एकतेचे सुंदर दर्शन घडते, हेच आपल्या संविधानाचे वैशिष्ट्य आहे असल्याचे ढोरे यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम बी वाघमारे होते.त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात मूळ राज्यघटनेतील कलमे, प्रकरणे आणि परिशिष्टे यावर प्रकाश टाकला. संविधान निर्मितीतील विविध टप्पे व घटना समितीतील सदस्याचे योगदान विशद केले. कार्यशाळेच्या शेवटच्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाशी निगडीत विविध पोस्टरचे सादरीकरण प्रमुख पाहुण्यासमोर केले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम बी वाघमारे यांनी दिली.
कार्यशाळेसाठी ॲड.अविनाश थोरवे,संस्थेचे विश्वस्त व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री.मनोहर चव्हाण,सौ.अश्विनी टेमकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेसाठी संस्थेचे अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्ही.बी.कुलकर्णी यांनी प्रोत्साहन दिले.संस्थेचे अध्यक्ष ॲड. संजय शिवाजीराव काळे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागास व स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या. कार्याक्रमचे आभार डॉ.सुप्रिया काळे यांनी मांडले.कार्यशाळा यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा.जयश्री कणसे, प्रा.मयूर चव्हाण,प्रा.विष्णू घोडे यांनी अथक प्रयत्न केले. महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक हे कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

