जुन्नर | जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील नारायणगाव आगाराच्या धोकादायक बस लोकांच्या दळणवळणासाठी पाठविल्या जातात, यामध्ये बसचे पत्रे तुटलेले आहेत, खिडक्या निखळलेल्या आहेत, अशा भंगार बसेस रस्त्यावर धोकादायकरित्या प्रवाशांना ये जा करण्याच काम करत आहेत.
वरील भागातील भिवाडे, इंगळून, आंबे हातवीज व सुकाळवेढे अशा घाट माथ्यावर या लांब पल्ला धावणाऱ्या बस आहेत.
कदाचित कोणती घटना कधी घडेल सांगता येत नाही, म्हणून चांगल्या बसेस महामंडळाने पाठवाव्यात, किती तरी वेळा या बस रस्त्यात बंद पडतात तर कधी मोठा अपघात होतो हे कुठपर्यंत चालणार?
वास्तविक सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि अशा धोकादायक बस प्रवाशांना त्यांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावताना दिसतात, मात्र हा प्रवास करताना प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो, वास्तविक प्रवाशांच्या सेवेसाठी किमान चांगल्या बस पाठवाव्यात अशाही काही बस आहेत की, बसच्या खिडक्या तुटल्यामुळे व छत तुटल्यामुळे सीटवर पाणी येते आणि सीट पूर्णतः ओले होते, त्यामुळे प्रवाशांना नाविलाजाने बस मधून उभे राहून हा प्रवास करावा लागतो.
खरं तर मागील काही दिवसापूर्वी इंगळूणच्या घाटात मोठा अपघात होऊन बसचे ब्रेक फेल होऊन चाक गळुन पडले त्यात ड्रायवरने जीवाची बाजी मारत प्रवाशांचा जीव वाचवला, या घटना वारंवार घडताना दिसतं आहेत, मात्र यावर कायमची उपाययोजना परिवहन महामंडळ का? करत नाही मग मोठा अपघात घडला की सर्व मंत्री अन प्रशासन जागे होते, हे म्हणजे फक्त वरवरची उपाय योजना करून सर्वसामान्य लोकांना वेड्यात काढल्यासारखच आहे, मात्र ग्रामीण भागातील लोकांना एसीचा प्रवास नको परंतु चांगला प्रवास करता यावा एवढी काळजी तरी घ्यायला हवी, एवढीच माफक अपेक्षा.
