बोतार्डे – जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोतार्डे येथे वानरांनी मोठ्या प्रमाणात हैदोस घालून आंब्याच्या झाडांचे व भूईमूगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे, बोतार्डे येथील डोंगराशेजारी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची बागायती क्षेत्रे असून त्यामध्ये आंबा लागवड, सोयाबीन, भुईमूग, भात, व वेलयुक्त शेंगा अशा विविध प्रकारची शेतीत पिके आहेत.
मात्र गेले एक वर्षापासून या भागात वानरांचा वावर हा दिवसेंदिवस वाढत चालला असून डोंगरात राहणारे हे प्राणी आता गावात देखील येऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करू लागले आहेत.
या भागामध्ये आंबा फळ लागवडीचे क्षेत्र असल्याने ही वानरे दिवसाढवळ्या आता आंब्यांच्या फांद्या तोडून व नविन फुटलेली पालवी कुरतडून फेकून देतात, त्यामुळे वास्तविक आंब्याच्या फुटीवर परिणाम होऊन वाढ खुंटली जात आहे. शेतकऱ्यांनी लाखो रूपये औषध फवारणी व झाडांना खते देण्यासाठी खर्च करून आपल्या उदरनिर्वाहाचे साधन केले आहे, मात्र असे नुकसान झाल्याने ही भरपाई न भरून निघण्यासारखी आहे.
उन्हाळ्यात डोंगराला वणवा पेटवल्यामुळे व पावसाळ्यात गुराखी आपली गुरे रानात नेऊ लागल्यामुळे या वानरांनी त्यांचे पलायन गावाच्या दिशेने धरले आहे. त्यामुळे त्यांना रानात खायला मिळत नसल्याने त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांवर आपला मोर्चा धाडला आहे, जवळपास शंभरच्या आसपास मोठी व छोटी अशी मोठ्या संख्येने वानरांची संख्या या रानात झाली आहे, माणसांवर देखील ते चाल करून येतात असे येथील नागरीकांनी सांगितले. त्यामुळे परिसरात एकच भीतीचे वातावरण आहे.
