आवाज वार्ता – पत्रकार मित्रांनो हे जरी मी लिहिलं असेल तरी आपण एका क्षेत्रातील आहोत आणि आपले देखील एक कुटुंब आहे, म्हणून मी हे धाडसाने लिहू शकतोय. पत्रकार म्हणजे काय रे भाऊ हे शिर्षक वाचून तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला का आम्हाला पत्रकार म्हणजे माहिती आहे तुम्ही सांगण्याची गरज नाही, खरं आहे परंतु माझ्या लेखी किंवा माझ्या सारख्या असंख्य पत्रकारांच्या लेखी पत्रकार म्हणजे फक्त बुम माईक अन ट्रायपॉड घेऊन एखाद्या ठिकाणची सविस्तर बातमी कवर करणे म्हणजे त्याला पत्रकार म्हणतात, या पलीकडे देखील पत्रकारांचे जीवन आहे.
सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत पत्रकार हे सातत्याने जागेच असतात, त्यांना आपली लेखणी तेवत ठेवावी लागते, कुठे अन्याय झाला तर पत्रकार, कुठे मोठी घटना घडली तर पत्रकार, कुठे अपघात झाला तर पत्रकार, कुठे भ्रष्टाचार उघड करायचा तर पत्रकार हे हजर राहतात असे कोणते ठिकाण नाही की, “जे न देखे रवी ते देखे कवी” या उक्तीप्रमाणे पत्रकार घटना घडल्याबरोबर त्या ठिकाणी हजर राहून आपले कर्तव्य बजावत असतात, मग कधी जीव धोक्यात घालून पत्रकारीता करावी लागते तर कधी आपल्या कुटुंबाला सोडून एक दोन दिवस तिथेच वार्तांकनासाठी थांबावे लागते, आपल्या कुटुंबासोबत दोन दिवस सुट्टीसाठी आलेला पत्रकार जेव्हा ऑफिसमधून फोन येतो तेव्हा मात्र त्याला आपल्या लहान मुलाला हातातून खाली ठेवून जड अंतकरणानं घरातून निघावं लागतं, फक्त समाजासमोर वास्तव मांडण्यासाठी मात्र आपले घरदार सोडून जेव्हा पत्रकार त्याच्या कार्यसेवेत हजर राहतो तेव्हा मात्र त्याला तुमच्या सारख्या लोकांमध्ये आपले स्वतचे कुटुंब दिसतं. म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा या तीनही ऋतूंत पत्रकार हे नेहमी तत्पर असतात, वास्तविक आजकाल डिजीटल मिडीया मोठ्या प्रमाणात वेगवान झाल्याने पत्रकारांना देखील त्याप्रमाणे चालावे लागते, त्यात मग पत्रकारांची कौशल्ये तितक्याच ताकदीने जोपासावी लागतात. उदा. बातमी टाईप करणे, शिर्षक, मथळा हे प्रिंट मिडीयात फार कसोशीने पत्रकारांना द्यावे लागतं, इलेक्ट्रॉनिक मिडियात मात्र आपण प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आपल्याला तिथे प्रत्यक्ष वार्तांकन करावे लागते तिथे मात्र आपण सावध राहून शब्दसाठा तयार ठेऊन पत्रकारांना तत्पर राहवे लागते, डिजीटल मिडियात वेवपोर्टलवर मात्र बातमी करताना व्यवस्थित तयार करून टाईप करून हेडींग देऊन पोर्टलमध्ये द्यावी लागते.
पत्रकारांना टायपिंग इतर कौशल्ये आत्मसात करावी लागतात, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, अर्थविषयक, शैक्षणिक, कला, क्रिडा, शेती व इतर विषयांचा अभ्यास ठेवावा लागतो म्हणजे पत्रकारांना कोणत्याही क्षणी कोणतीही घटना घडू द्या किंवा कोणताही विषय येऊ द्या त्या विषयांचा तगडा अभ्यास ठेवावा लागतो.
पत्रकारीता करताना पत्रकारांना एकांगी बातमी करून चालत नाही म्हणून दोन्ही बाजू समजून घेऊन त्यावर वार्तांकन करावे लागते, निष्पक्ष व निडर बातमीदारी करावी लागते म्हणून कधी कधी पत्रकारांवर हल्ले तसेच धमकी देखील देण्याचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, तरीदेखील आमचे पत्रकार बांधव न घाबरता आपली पत्रकारीता स्वच्छ करत राहतात. आजकाल कुठूनही एक सूर येतोय तो म्हणजे पत्रकारीता विकली गेली, हे चुकीचं आहे पत्रकारीता विकली गेली हे म्हणण काही बरोबर नाही, कारण पत्रकारीता जर विकली गेली असती तर समाजातील अन्याय, भ्र्ष्टाचार उघड करताना सर्वांची दमछाक झाली असती, पत्रकार अजूनही समाजात चांगल्या प्रकारची पत्रकारीता करत आहेत त्यामुळे पत्रकारीता जीवंत आहे. आमचा लोकशाहीचा चौथा खांब हा सध्या लोकशाहीला बळकट करत आहे हे इथून पुढेही करत राहिलं यात तिळमात्र शंका नाही.
लेखन - प्रा. सतिश संतोष शिंदे
