मेरे देश की धरती सोना उगले
उगले हिरे मोती मेरे देश की धरती.
भारतीय संस्कृतीत शेतीला फार महत्त्वाचे स्थान आहे. भारत कृषिप्रधान देश आहे. येथे शेतकरी हा देशाचा कणा मानला जातो. जगातल्या सर्वच प्राणी मात्रांना जगण्यासाठी अन्नधान्यांची गरज असते. शेतकरी पूर्व काळापासून ताकत व कष्टाच्या कामांसाठी बैलांच्या सहाय्याने शेती करत आला आहे. शेतीच्या विविध मशागती, नांगरणी, कोळपणी, पाळी घालणे, पेरणी, मोटनाडा ओढणे या सर्वांपासून ते तयार झालेले धान्य घरात किंवा बाजारात गाडीने ओढून पोहोचवण्याच्या कामात त्याला बैलांची मदत होत असते. यासारख्या कामांमध्ये बैलांचे योगदान अमूल्य आहे. शेतकरी आपल्या श्रमाने शेताला संपन्न करतो, धान्य पिकवतो, आणि समाजाला अन्नदान करतो. मात्र या सर्व प्रक्रियेत शेतकऱ्याला याच सोबत्याची साथ मिळत असते, त्यामुळेच बैलाला शेतकऱ्याचा “जीवनसाथी” म्हटले जाते.
या मेहनती साथीदाराला सन्मान देण्यासाठी, बैलांच्या परिश्रमांचा गौरव करण्यासाठी, त्यांना एक दिवस तरी विश्रांती देण्यासाठी महाराष्ट्रासह देशातील इतर कृषीप्रधान राज्यांत ‘बैलपोळा’ हा सण साजरा केला जातो. हा सण इतर काही राज्यांमध्ये "बेंदूर" या नावाने ओळखला जातो. उन्हाळ्यात मशागतीची, तर पाऊस सुरू झाल्यावर पेरणीची कामे जोमाने झालेली असतात. या सर्व कामांचा ताण बैलांवर पडलेला असतो. श्रावण सरींच्या ऊन पावसाच्या लपंडावात पावसाळा सुरु असतो. त्यामुळे त्यांना विश्रांती देऊन हा सण साजरा करणे ही परंपरा रूढ झाली आहे. 'श्रावण पोळा' हा सण प्रामुख्याने श्रावण महिन्यात शेवटच्या दिवशी अमावस्येला केला जातो. तर त्यानंतर एक महिन्याने येणाऱ्या भाद्रपद अमावस्येला 'भाद्रपदी पोळा' काही भागांमध्ये साजरा होतो.
सकाळपासूनच शेतकरी बैलांची छान निगा राखतात. आंघोळ घालून त्यांच्या अंगाला तेल चोळले जाते. त्यांच्या शिंगांना सुरी सारख्या हत्याराने साळून चमकवले जाते. रंगवून त्यावर रंगीबेरंगी बेगडे लावले जातात. शिंगांना तेल व रंग लावून चमकदार करतात. काही ठिकाणी शिंगांवर सोनेरी किंवा चांदीसारखा चमकणारा रंग दिला जातो. हळद आणि गुलाल यांचा वापर करून, रंगांचे पट्टे त्यांच्या अंगावर ओढले जातात. पाठीवर नंदिबैलासारखी, रंगीत कपड्यांची झुलही चढवली जाते. फुलांचे हार, झेंडूच्या फुलांच्या माळांनी आकर्षक शृंगार करून बैलांना सजवले जाते. गळ्यात घंटा, कवड्याच्या माळा, गजरे, घुंगरंमाळा बांधतात. या सजावटीमुळे बैल अत्यंत आकर्षक दिसतात. बैलांना हळद-कुंकवाचा मान देऊन पूजन व औक्षण करून त्यांना गोड धान्याचा नैवेद्य दाखवला जातो. विशेषत: त्यांना तूप, गूळ, पुरणपोळी, हरभरा, भाकरी, बाजरीच्या कणसाचे खाद्य खायला दिले जाते. गावोगावी बैलांची मिरवणूक निघते. लोक ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदंग वाजवत, गाणी म्हणत बैलांची फेरी काढतात. पारंपरिक नृत्य व लेझीम पथक यामुळे गावात जल्लोष पसरतो. लहान मुलं बैलांच्या मागे नाचत, गाणी म्हणत मिरवणुकीत सहभागी होतात. काही ठिकाणी बैलांच्या शर्यती व खेळांचे देखील आयोजन केले जाते.
माझ्या मामाची रंगीत गाडी हो
त्याला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो
ढवळ्या-पवळ्या, सर्जा-राजा, हऱ्या-नाऱ्या, चितांग्या-पतंग्याची यांची खिलारी जोडी तुमच्या आजोबा आणि वडिलांकडे पूर्वीच्या काळी तुम्ही पाहिली असेल. बालपणी बैलांची आणि बैलगाडीची मुलांना भारी हौस असते. मामाच्या गावाला जाण्यासाठी मामा त्याकाळी असाच सणासुदीला बैलगाडी घेऊन बहिणीला व भाच्यांना न्यायला मुऱ्हाळी म्हणून येत असे. बैलांना पाणी पाजण्यासाठी नेणे, शेण काढणे, कडबा कुट्टी करून टाकणे ही कामे शेतकऱ्यांच्या कुटुंबातील साऱ्यांनाच करावी लागतात. बैल जुंपणे, कासरे हाती घेणे, मानेवर जू ठेवणे व शिवळा लावणे ही तर मुलांची आवडती कामे. बैलगाडी जोरात पळण्यासाठी त्यांच्या शेपटीला हात लावणे व कासरा उडवणे ही मनापासून आनंद देणारी कामे लहान मुले व मोठी माणसे आवडीने आणि हौसेने करत असतात. आणि ही बैलगाडी एखाद्या खोल वाटेने अथवा माळरानावरील रस्त्यावर धुराळा उधळवत पळवणे हे त्यांच्या मनाला आनंद, हर्ष देणारी बाब त्यादिवशी शिगेला पोहोचते.
जिवा शिवाची बैल जोड़ऽऽऽऽ
लाविल पैजंला आपली कुडंऽऽ
डौल मोराच्या मानचा रं डौल मानचा
बैल हा तसा शांत, मायाळू प्राणी आहे. यात्रा, जत्रांच्या आणि पुढाऱ्यांच्या वाढदिवसाच्या दिवसांना घाटा घाटात बैलगाड्याच्या शर्यतींना न्यायालयाची बंदी आहे. मानव आपल्या स्वतःच्या विरंगुळ्यासाठी त्याचा खेळ करतो. त्याला सरळ रेषेत, दोरीत आणि एका तासात हाकायचे असेल तर आवाज देऊन, त्याच्या नावाने ओरडून, पऱ्हानी, चाबूक व आसूड यांचा वापर शेतकरी करतात. यांचा जास्त वापर झाला तर... त्याचाही राग अनावर होतो. तो मालकावरही डुख धरतो. शिंगे उगारून, गुरं...गुरं.. करतो. आणि समोरच्या माणसाला डोक्यावर घेऊन उडवतो, खाली आपटतो... पोटात शिंग खूपसतो. थोड्याशा मंद असणाऱ्याने एखादे काम ऐकले नाही तर, माणसांना सुद्धा कधी कधी बैलाची उपमा दिली जाते. बैलपोळ्याच्या दिवशी चांगले कपडे घातली असतील तर, विनोदाने... थट्टा मस्करीने टिंगल टवाळी केली जाते. कॉलेजमध्ये असताना आमचा एक मित्र होता. तो त्याच्या त्याच्या विश्वात नेहमी दंग असायचा. त्याला त्याच्या स्वतःच्या नावाने हाक मारली तर लक्ष द्यायचा नाही. परंतु "बैल..!" या नावाने हाक मारली तर तो लगेच ओ..! द्यायचा.
या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी व बैल यांच्यातील आत्मीयतेचा बंध. शेतकऱ्याच्या कष्टामागे बैलांची ताकद असते. म्हणूनच हा दिवस केवळ सण नसून शेतकऱ्याच्या आयुष्याला आधार देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारा दिवस आहे. आजच्या यांत्रिकीकरणाच्या काळात ट्रॅक्टर, मशीन आले तरी बैलांचे महत्त्व अजूनही संपलेले नाही. शेतकऱ्याने बैलांना पूजणे म्हणजे मानव व प्राणी यांच्यातील सहजीवनाचे प्रतीक आहे. कृतज्ञतेची भावना जागवणारा सांस्कृतिक वारसा आहे. तो केवळ प्राणीपूजा किंवा शेतकरी सण नाही, तर शेतकरी– बैल– निसर्ग यांच्यातील नाळ दाखवणारा सोहळा आहे. शेतकऱ्याचे जीवन बैलांशिवाय अपूर्ण आहे. म्हणूनच त्यांच्याबद्दल कृतज्ञता, आदर, आपुलकी व्यक्त करणे ही आपली जबाबदारी आहे. हा सण परंपरेतून आजही जिवंत आहे. बैलांना आणि शेतकरी राजाला नेहमीच सुगीचे दिवस यावेत. फक्त आपल्या नाचण्याच्या हौसेपाई बैलांच्या कानांना बधीर करणारा डीजेचा आवाज, बैलांच्या या एक दिवसीय सुट्टीच्या, सणाच्या दिवशी तेवढा बंद व्हावा.
*लेखक -डॉ. प्रवीण डुंबरे,*
*शिवजन्मभूमी, ओतूर (पुणे)*
9766550643
