प्रतिनिधी जुन्नर | प्रा. प्रविण ताजणे सर
समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल या सी.बी.एस.सी मान्यता प्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील इयत्ता पहिली ते दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक जवळपास 150 गणेशमूर्ती तयार करून एक आगळीवेगळी जाणीव करून दिली. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे (POP) होणारे प्रदूषण टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाडूची माती, नैसर्गिक रंग, कागद लगदा तसेच धान्याचे पीठ यांचा वापर करून सुंदर व आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी समाजाला ‘निसर्ग वाचवा – उत्सव साजरा करा’ असा संदेश दिला. मूर्तीच्या सजावटीसाठी विद्यार्थ्यांनी जे साहित्य वापरले ते सुद्धा नैसर्गिक फुले, पाने, कागद, धागे, कापड, लाकूड बांबू अशा प्रकारचे होते. पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्यासाठी समर्थ गुरुकुलच्या कला शिक्षिका दीप्ती चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. समर्थ गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे सर, क्रीडा संचालक एच.पी. नरसुडे सर, सखाराम मातेले सर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःची मूर्ती घरी नेऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले.
मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, “गणपती बाप्पाची आराधना करताना पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारीही आपण पार पाडली पाहिजे. हीच खरी निसर्ग संवर्धन काळाची गरज आहे .”
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलतेबरोबरच पर्यावरणप्रेमाची बीजेही पेरली गेली असून, समाजात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श निर्माण झाला.
माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,संचालिका सारिकाताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या या कार्यशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक केले.

