Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

लेखक दिलीप कजगांवकर लिखित कथा "वरद"

 


गणरायाच्या कृपेची प्रचीती देणारी, सत्य घटनेवर आधारित कथा


वरद

----


डॉक्टर साहेब, पटकन चला, आमच्या सोसायटीतला वरद पाचव्या मजल्यावरून खाली पडलाय, आबासाहेब कळवळून म्हणालेत. 


मी पटकन माझ्या असिस्टंटला ऑपरेशन रूम आणि इतर तयारी करायला सांगितले, बॅग उचलली आणि शेजारच्या फ्रीडम सोसायटीकडे निघालो.


अहो, वरद जेमतेम पाच वर्षांचा मुलगा, मागच्याच आठवड्यात येथे राहायला आला. वडील एका मोठ्या कंपनीत मॅनेजर, नुकतेच ऑफिसला गेलेत. त्याच्या घराच्या बाल्कनीचे काम सुरू आहे. खेळता खेळता वरद तेथून खाली पडला, पाचव्या मजल्यावरून. 


आम्ही घटनास्थळी पोहोचलो. नवीन इमारतीच्या कॉलम्सचे काम चालू होते. डॉक्टर साहेब आलेत, कोणीतरी ओरडले. 


एका भल्या मोठ्या कॉलमसाठी लावलेल्या लोखंडी सळयांच्या अगदी जवळ वरद पडला होता आणि तेही चक्क पायांवर. वरदचे पाय गुडघ्यापर्यंत चिखलात बुडाले होते. गर्दी बरीच होती पण फक्त बघ्यांची.


दोघा मजुरांनी वरदला चिखलातून वर काढले. मी सावकाश बाजूच्या पाण्याच्या पाईपने वरदचे पाय धुतले. दुखतंय का? दुखतंय का ? मी विचारत होतो. मी बाजूलाच एका पोत्यावर वरदला झोपवून तपासले. 


आश्चर्य म्हणजे वरद बिलकुल ठणठणीत होता. ना जखम, ना फ्रॅक्चर, ना अॅापरेशन ची गरज! समजण्या पलिकडचे सत्य. 


वरदची पडण्याची पोझिशन २ - ३ ईंचांनी जरी बदलली असती तर? विचारही करवत नाही. अगदी जवळच राक्षसी सळया होत्या. काहीही होऊ शकले असते. 


कसा पडलास तू? मी विचारले. डॉक्टर माझ्या हातात की रिंग होती आणि ती हातातून निसटली, ती पकडायला मी वाकलो आणि खाली पडलो, पण रिंग पकडली, सोडली नाही. ही पहा ती रिंग. मी रिंग हातात घेतली. सुंदर चित्र होते त्यावर, बाल गणेशाचे. 


एका मोठ्या अपघातातून गणरायाने वरदला वाचविले आहे. घाबरायचे काहीही कारण नाही, वरद एकदम ठीक आहे, मी डिक्लेअर केले. 


डॉक्टर माझी रिंग द्या ना. 


वरदचे त्या रिंगवर अफाट प्रेम आहे, वरदची आई सांगत होती.


(सत्य घटनेवर आधारित)


-दिलीप कजगांवकर, पुणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.