गुड मॉर्निंग, उठणार का? चहा तयार आहे असे अगदी लडिवाळपणे म्हणत मला उठवताना बायकोने चक्क माझ्या गालावर ओठ टेकवलेत. आम्ही दोघांनी वाफाळलेल्या चहाचा आस्वाद घेतला. स्वतःच्या मोकळ्या केसांशी खेळत बायको म्हणाली एक गुड न्यूज आहे, सांगू का? सांग सांग, मी अधीरतेने म्हणालो.
आज कीनई माझा दादा आपल्याकडे येणार आहे. आता "दोघात तिसरा आणि तोही बायकोचा भाऊ" ही काही गुड न्यूज आहे का? बायको नाराज होऊ नये म्हणून मी म्हणालो, वा, वा कित्ती छान! परिणाम अनपेक्षित झाला, माझ्या ओठांचे भाग्य उजळले.
सुमारे अर्ध्या तासाने दारावरची बेल वाजली. दादाचे त्याच्या तीन जीवलग मित्रांसह आमच्या घरी आगमन झाले. ताई, तू फक्त चहाच कर. नाश्ता, दुपारचे जेवण आम्ही बाहेर घेऊ, जिजुंनाही बरोबर घेऊन जाऊ, दादाने फर्मावले.
मी पाहुण्यांचा ड्रायव्हर बनलो. एफ सी रोडवरील एका महागड्या रेस्टॅारंटमध्ये आम्ही भरपेट नाश्ता आणि गरम गरम कॅाफी घेतली. चौघेही मित्र बिल भरण्यास आतुर होते. शेवटी दादाने मध्यस्थी केली. माझे जिजु आपल्याला बिल देऊ देणारच नाहीत. मी नाईलाजानेच ते चार आकडी बिल भरले.
जिजु, मस्त पुणे दर्शन करू या, गाडीत माझ्या बाजूला बसलेल्या दादाची विनंती वजा आज्ञा. पुढे पेट्रोल पंप दिसताच, दादाने गाडी थांबवायला सांगितले. दादाने टॅंक फुल करून घेतली. दादाचे क्रेडिट कार्ड न चालल्याने माझ्यासह त्याच्या तीन्ही मित्रांनी कार्ड दिले. मी जाम खुश झालो कारण मला डेबिट मेसेज आला नाही. फुकटात टॅंक फुल झाली होती.
भरपूर भटकंती, दोन वेळा टपरीवर चहा आणि खारी. कॅश पेमेंट अर्थात दादाने केले. पॅाश हॅाटेलमध्ये जेवण आणि आईस्क्रीम. पेमेंट क्रेडिट कार्डने. माझे कार्ड दादाकडेच होते पण त्याने ते हुशारी करत वापरले नसावे. घरी परतण्यापूर्वी आम्ही मॅालमध्ये गेलो. दादाने स्वतःसाठी, तीन्ही मित्रांसाठी आणि मी नाही म्हणत असताना देखील माझ्यासाठीही किमती शर्ट घेतला. मोठ्या खुशीत आम्ही घरी पोहोचलो.
बायकोने तयार ठेवलेल्या कढी खिचडीचा सर्वांनी आस्वाद घेतला. दादाने कॅब बुक करून माझी एअरपोर्ट फेरी वाचवली, बायको मात्र हिरमुसली. कॅब थोडी पुढे जाऊन परत आली, दादाने थॅंक्स म्हणत माझे क्रेडिट कार्ड परत केले. कित्ती काळजी घेतो माझा दादा. खरंच की, मीही मोठ्या प्रेमाने म्हणालो.
दादा, खूप हुशारही आहे. पेमेंट करायला त्याचे किंवा माझे कार्ड न वापरता मित्रांचे कार्ड वापरले. दादा आला काय नी लगेच गेला काय. आम्हा दोघांनाही हुरहूर लागली.
बायको तीच्या फोनवर बोलत होती, मी माझा फोन बघितला. ४ डेबिट मेसेजेस, म्हणजे सर्व ठिकाणी, अगदी कॅब बुक करायलाही माझेच कार्ड वापरले होते. दादाने त्याच्या मित्रांसमोर मला हिरो बनवले होते.
बायकोने फोन ठेवला नी मोठ्या उत्साहात खूशखबर दिली. उद्या माझी धाकटी बहीण येतेय, एक दिवसच राहणार आहे.
अगं उद्या आम्हा मित्रांचं गेट टुगेदर आहे ना. मी सकाळी ८ वाजता जाईन नी रात्री १० वाजता परत येईन. मेहुणीला मिस करीन मी. मला सुटकेचा मार्ग सापडला होता.
काहीच हरकत नाही. तीची फ्लाईट रात्री ११ वाजता येणार आहे. तु परत आल्यावर आपण तीला घ्यायला एअरपोर्टला जाऊ, फ्लाईंग किस देत बायको म्हणाली.
वेलकम! मी वेलकम असे मिळालेल्या किसला म्हणालो की येणाऱ्या मिसला म्हणालो की क्रेडिट कार्डच्या संभाव्य वापराला म्हणालो, माझे मलाच समजले नाही.
(संपूर्णतः काल्पनिक)
-दिलीप कजगांवकर, पुणे
