नेहा आणि राज - उमदं जोडपं. दोन वर्षांपूर्वीच लग्न बंधनात अडकलेले, अॅरेंज्ड मॅरेज. नेहाला नोकरी मिळाली नाही, नाईलाजानेच ती गृहीणी बनली.
रीना - नेहाची मैत्रिण, सुंदर, अविवाहित, भरपूर पगाराची नोकरी, उच्चभ्रू सोसायटीत एकटीच राहणारी.
वरद - नेहाचा धाकटा भाऊ, आई-वडीलांचं लाडकं कोकरू, नोकरी ऐवजी छोकरीच्या मागे लागलेला, स्वतःचा व्यवसाय लवकरच सुरू करतो असे दोन वर्षांपासून सांगणारा.
आज रविवार आणि विशेष म्हणजे रीनाचा वाढदिवस. राज आणि नेहाने रीनासाठी छानसं गिफ्ट कालच आणून ठेवलं होतं. किंमत जरा जास्तच होती पण तरीही राजने मोठ्या खुषीत घेतलेले, कुरकुर किंवा चिडचिड न करता.
रीनाने फक्त नेहा आणि राजला आज घरी बोलावले होते. राज घाई करत होता पण नेहा मेकअप करण्यात मग्न होती. ते रीनाकडे जायला निघणार तेवढ्यात वरदचे आगमन झाले. मी थोडा वेळच थांबणार, वरदने आल्या आल्याच सांगितले. नेहाने बंधुराजाचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. वरद फ्रेश व्हायला आत गेला.
राज - आता काय करायचे?
नेहा - कशाचे?
राज - रीना वाट पहात असेल.
नेहा - बघू दे, तू कशाला विचार करतोस?
राज - तीने बिचारीने तयारी करून ठेवली असेल.
नेहा - एवढी काळजी वाटते तर जातोस का तू एकटा?
राज - तुझी हरकत नसेल तरच जाईन मी. जाऊ का?
नेहा - तुला हेच तर हवं होतं ना? तीच्याकडे एकटं जायला आवडतं ना? मी नसले की तीच्याकडे जेवायला जातोस, माहीत नाही का मला?
राज - बरं बाई, नाही जात मी.
नेहा - कसा जाशील? माझा दादा आलाय ना. आमच्या गप्पा ऐकायच्या असतील.
राज - मी आपल्या रूममध्ये बसतो. तुम्ही निवांत बोला.
नेहा - तरीच ते, म्हणजे मी लॅाकरमधून काही पैसे काढते का, दादाला द्यायला, लक्ष ठेवायचे असेल तुला? बरोबर ना?
राज - नेहा मी आपल्या घरासमोरील गार्डन मध्ये बसतो, ठीक आहे ना?
नेहा - इतकी का मी मूर्ख आहे? दादा परत जाताना त्याला एकट्याला गाठून आठवण करून द्यायची असेल, तुझ्याकडून घेतलेल्या पाच लाखांची. देणार आहे तो लवकरच, व्याजासकट, समजलं ना? (हे वाक्य राज गेलं वर्षभर ऐकत होता.)
राज - मी टेरेसवर बसतो, हे तर चालेल ना?
नेहा - समजलं, समजलं. मी दादाशी बोलण्यात गर्क असताना तू रीना बरोबर गुलुगुलु गोष्टी करशील, खरंय ना?
राज - बाईसाहेब, मी देवघरात बसतो
नेहा - देवभक्तीचे सोंग घेवून दादाला भुलवायचा प्रयत्न करायचा ना?
राज - मी काय करू? तूच सांग नेहा
नेहा - समजतं, समजतं, म्हणजे जगाला सांगायला मोकळा, मी बायकोच्या शब्दाबाहेर नाही.
तेवढ्यात दारावरची बेल वाजली. राज, जा बघ, कोण आलंय. राजने दार उघडले. साक्षात बर्थडे गर्ल रीना! राजने रीनाचे स्वागत केले. आता ही कशाला कडमडली? नेहा मनातल्या मनात पुटपुटली.
आता आलीच आहे तर काम उरकून घेऊ म्हणत नेहाने रीनाला विश करत बर्थडे गिफ्ट दिले. एकमेकींच्या मिठीत दोघीही भावनाविवश झाल्याचे पाहून राजलाही गहिवरून आले. नेहा अॅारेंज ज्युसचे ग्लास घेऊन आली आणि क्षणभर थबकली. आजूबाजूला कोणीही नाही हे पाहून, रीना राजला गुपचुप देत होती ...........
एक ??
एक ??
एक बंद पाकिट. मी गिफ्ट दिले आणि रिटर्न गिफ्ट राजला? नेहाने न राहवून विचारले.
नेहा, तुझ्या दादाला द्यायला दोन लाख रुपये दिलेत मी तुझ्या नवऱ्याला. त्यासाठीच त्याने मला इकडे यायला सांगितले. तेवढ्यात वरद हॅालमध्ये दाखल झाला. राजने पाकीट वरदला दिले. थॅंक्स रीना आणि राज, बाय नेहा म्हणत वरदने आनंदाने निरोप घेतला.
म्हणजे दादाचे येणे राजला माहित होते आणि रीनाकडून पैसे आणण्यासाठीच तो घाई करत होता रीनाकडे जायची. खूप भोळा भाबडा नी परोपकरी आहे माझा नवरा. मी मेली उगीचच सारखा संशय घेते त्याच्यावर. रीनाही किती चांगली, राजचा निरोप मिळताच पैसे घेऊन आली माझ्या दादासाठी.
दादा लगेचच गेल्याने नेहाचा चेहरा पडला. बुडीत खात्यातील रक्कम २ लाखांनी वाढल्याने राजची चिंता वाढली. आता मला भेटायला नेहा राजला मना करणार नाही म्हणून रीना खुष झाली. पैसे उकळायला "राज-रीना" रूपी भक्कम तिजोरी सापडल्याने वरद अगदी निश्चिंत झाला.
-दिलीप कजगांवकर, पुणे
