Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

लेखक दिलीप कजगांवकर लिखित कथा "धक्का"



सदानंद माने एका छोट्याशा कंपनीतील कारकून. सावित्रीबाई या त्यांच्या पत्नी. राज आणि नेहा हे जुळे अपत्य. परिस्थिती अगदीच बेताची. 


तीन वर्षांपूर्वी सदानंद निवृत्त झाले आणि योगायोग म्हणजे इंजिनीयर झालेल्या राज आणि नेहाला त्याच दिवशी एकाच कंपनीत ट्रेनी इंजिनियर म्हणून नोकरी मिळाली.


सदानंदांचा पगार बंद होणार होता परंतु राज आणि नेहाचा पगार सुरू होणार होता त्यामुळे सदानंद निश्चिंत होते. सदानंद ऑफिसला जरा लवकरच गेले, ऑफिसची कामे आटोपली, त्यानंतर निरोप समारंभ पार पडला. थोडे उशिराच सदानंद घरी परतले.


कसा होता राज आणि नेहाचा ऑफिसमधील पहिला दिवस? घरात शिरताच सदानंदांनी विचारले. 


ते दोघेही कंपनीत जॉईन झाले नाहीत, सावित्रीबाईंकडून हे ऐकून सदानंदांना खूप मोठा धक्का बसला. 


त्या दोघांना पुढील शिक्षण घ्यायला अमेरिकेत जायचे आहे. त्यांना तेथील प्रवेश मिळाल्याचा ई-मेल आजच आला, सावित्रीबाईंनी पुढची माहिती दिली.


पीएफ, ग्रॅज्युएटी, लिव्ह एनकॅशमेंट वगैरेची मिळालेली सर्व रक्कम सदानंदांनी मुलांच्या अॅडमिशन साठी भरली. एवढेच काय, राहते घर बँकेकडे गहाण ठेवून सदानंदांनी त्यावर कर्ज घेतले. कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी नोकरी शोधली आणि त्यांचे कष्टमय जीवन पुनश्च सुरू झाले. 


नेहा आणि राजने पुढील दीड वर्षात शिक्षण पूर्ण केले आणि त्यांना चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. कर्जाचा हप्ता फेडण्याची जबाबदारी दोघांनी मिळून स्वेच्छेने स्वीकारली. आग्रह करून राज आणि नेहाने वडिलांना नोकरी सोडायला भाग पाडले.


सहा महिन्यानंतर राज आणि नेहा सुट्टीत भारतात आलेत, त्यांनी घराला रंगरंगोटी करून घेतली. बाबा आपण आता घरातले फर्निचर आणि इतर अॅप्लायन्सेस देखील बदलवु, नेहा आणि राजने आग्रह धरला. 


हे फर्निचर अजुन चांगले आहे, मी स्वतः मोठ्या कष्टाने बनवून घेतले आहे. आपल्यावर कर्जाचा बोजा असताना फर्निचर बदलवायला नको, नंतर बघू, सदानंदांनी त्यांचा निर्णय दिला, सदानंदांचा निर्णय म्हणजे काळ्या दगडावरची रेघ.


सदानंद आणि सावित्रीबाईंनी राज आणि नेहासाठी स्थळं शोधणे सुरू केले. आवडलेल्या प्रोफाईल्स त्यांनी राज आणि नेहाला पाठविणे चालू केले. सुरूवातीला प्रोफाईल्स वर राज आणि नेहा प्रतिक्रिया पाठवित होते परंतु हळूहळू त्यांच्या प्रतिक्रिया येणे बंद झाले. 


सकाळी सकाळीच सुटा बुटात आलेल्या तरुणाने सदानंदांना खूपच मोठा धक्का दिला. तुमच्या घराचे हप्ते दोन महिन्यांपासून थकले आहेत असे सांगणारा तो तरुण, बँकेचा मॅनेजर होता. त्याच्या सांगण्यावर सदानंदांचा विश्वासच बसत नव्हता. आठ दिवसांची मुदत देतो, पैसे भरले नाहीत तर घरातील फर्निचर उचलून नेईल, बँक मॅनेजरने धमकावून सांगितले.


सदानंदांनी राज आणि नेहाला फोन केला परंतु त्यांनी फोन उचलला नाही. बऱ्याचदा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी सावित्रीबाईंचा फोन उचलला. राज आणि नेहाकडून जे समजले ते खूपच धक्कादायक होते. दोघांची नोकरी गेली होती. त्यामुळे सदानंद आणि सावित्रीबाईंनी घरावर आलेल्या जप्तीबद्दल मुलांना काहीही सांगितले नाही. 


पुढील आठवड्यात बॅंक मॅनेजरने निम्मे अधिक फर्निचर उचलून नेले. सदानंद आणि सावित्रीबाईंची झोप उडाली. मुलांना हे सांगण्यात अर्थ नव्हता. एकतर नोकरी नाही आणि घरभाडे, खाणेपिणे नी इतर खर्च, कसे भागवत असतील बिचारे.


सदानंदांनी प्रयत्न करून परत एकदा नोकरी मिळवली. जेमतेमच पगार मिळणार होता. पुढच्या आठवड्यात अगदी सकाळी उरले सुरले फर्निचर नेताना, "आता तरी हप्ता भरा, नाहीतर घर खाली करावे लागेल" मॅनेजरने ठासून सांगितले. साहेब थोडी मुदत द्या, मी पुढच्या आठवड्यात नोकरी सुरू करतोय, मी यापुढचे हप्ते वेळेवर भरेन, सदानंदांनी कळवळून सांगितले.


सावित्री, मी रक्ताचे पाणी करून घरावरची जप्ती टाळेल. तु अजिबात काळजी करू नकोस सदानंदांनी सावित्रीबाईंना धीर दिला.


आता अजून काय? दुपारी परत आलेल्या मॅनेजर साहेबांना पाहून सदानंदांना प्रश्न पडला.


काका अहो, माफ करा. "सा" चा "मा" झाला. जप्ती सदानंद मानेंच्या नाही तर सानेंच्या घरावर होती. आमच्या चुकीची भरपाई म्हणून प्लीज आम्ही आणलेल्या ह्या नवीन फर्निचरचा स्वीकार करा. मॅनेजर साहेबांनी उत्तम दर्जाचे नवीन फर्निचर घरात आणले.


घर कसे नवीन आणि इंप्रेसिव्ह दिसते, सावित्रीबाईच काय पण सदानंदांनी सुध्दा मान्य केले. 


काहीही असो पण जुन्या फर्निचरमध्ये सदानंदांच्या भावना गुंतल्या होत्या. बॅंकेने ते विकले असेल की भंगारात टाकले असेल? त्यात माझ्या वडिलांनी दिलेला टेबल होता, माझ्या पहिल्या पगारात घेतलेला टीपॅाय होता, लग्नात मिळालेला टेबल लॅम्प होता.


दारावरची बेल वाजली. सदानंद साने इथेच राहतात ना? एक आजोबा विचारत होते. साने नाही माने. काय काम आहे? सदानंदांचा प्रश्नार्थक चेहरा. तुम्ही आमच्या वसतीगृहाला अगदी सुस्थितीत असलेले फर्निचर डोनेट केल्याबद्दल मनापासून आभार मानायला मी आलो आहे. आपले फर्निचर चांगल्या ठिकाणी वापरले जातेय हे ऐकून सदानंदांना हायसे वाटले.


आज दोघांनाही छान झोप लागली. पहाटे ५ वाजताच दारावरची बेल वाजली. 


इतक्या पहाटे कोण आले असणार? आणि काय आश्चर्य! राज आणि नेहा, काहीही न कळवता समोर दत्त म्हणून उभे ठाकले. हाही खुप मोठा धक्का होता. नोकरी नसलेली मुले, इकडे कशी आली? काही मोठा प्रॅाब्लेम तर नसेल ना? आपल्याला अजून कर्ज काढायला लागेल का? व्यथित करणारे अनेक प्रश्न.


सकाळी १० वाजता आलेल्या बॅंक मॅनेजरला पाहून सदानंद दचकलेत. राज, नेहा "या साहेबांचीच कृपा, यांनीच हे नवे कोरे फर्निचर आपल्याला दिले", त्यांनी मुलांना सांगितले.


काका, मला साहेब म्हणु नका आणि थॅंक्स तर अजिबात म्हणु नका. मी राजचा मित्र, आणि मी जे काही केले, ते राज आणि नेहाच्या सांगण्याप्रमाणे. 


सदानंदांना हा मोठा धक्का होता, पण दोघा मुलांची नोकरी शाबुत आहे हे समजल्यावर त्यांनी आणि सावित्रीबाईंनी सुस्कारा सोडला.


बाबा तुम्ही पाठविलेल्या स्थळांपैकी २-३ मुलांशी मी बोलले आणि त्यातला एक मुलगा मी निवडला आहे. राजलाही तो आवडला आहे आणि उद्या सकाळी तो आपल्याकडे येईल, अर्थात् तुम्ही हो म्हटले तरच, नेहा बोलताना लाजली. हा तर खुपच मोठा सुखद धक्का होता सदानंद आणि सावित्रीबाईंसाठी.


मीही मुलगी निवडली आहे, तुम्ही पाठविलेल्या स्थळांपैकी. तुमच्या होकाराची आवश्यकता आहे, राज म्हणाला. पुनःश्च सुखद धक्का.


नेहा कुणाशी तरी फोनवर बराच वेळ बोलत होती. नेहाने फोन बाबांना दिला. सदा, अरे काळाप्रमाणे बदलायला हवे. अरे, आता नेहाचे लग्न करायचे, घरात सून आणायची मग घर आकर्षक नको का दिसायला? जुने फर्निचर बदलायला तुझा ठाम नकार असल्याचे नेहाने कळविले म्हणुन मीच राज आणि नेहाच्या मदतीने हे नाटक घडवून आणले. सदानंदांचे वयोवृद्ध पिताश्री सांगत होते. 


बाबा तु....म्ही....ही.... म्हणताना राज आणि नेहाला मायेने जवळ घेतलेल्या सदानंदांना आश्रू आवरता आले नाहीत.


एकामागून एक बसणाऱ्या धक्क्यांमुळे सदानंदांना बदलणे भाग होते. यापुढे सर्व काही होणार ते नेहा नी राजच्या म्हणण्या प्रमाणे, त्यांनी डिक्लेअर केले.


निश्चयी नी कठोर सदानंदांमधील हा बदल निश्चितच मोठा सुखद धक्का होता राज, नेहा आणि सावित्रीबाईंसाठी.


माने साहेब, तुम्ही कन्सल्टंट म्हणून आम्हाला मार्गदर्शन करा, दिवसातील फक्त १ तास आम्हाला देत जा, एका कंपनीतुन फोन आला. परत एकदा सुखकर धक्का.


आम्ही सर्व कर्ज फेडले आहे. यापुढे हप्ता नसणार, नेहाने सांगितले. पुनश्च सुखकर धक्का.


ही अॅाफर स्वीकारा. राज, नेहा आणि सावित्रीबाईंनी एकसुरात सांगितले. पैशासाठी नव्हे तर तुमचा वेळ जावा म्हणून. हा तर खुपच मोठा पण हवाहवासा वाटणारा सुखद धक्का होता सदानंदांसाठी.


-दिलीप कजगांवकर, पुणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.