Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

लेखक दिलीप कजगांवकर लिखित कथा बायपास



राज न्यूयॉर्कहुन मुंबईला आला आणि त्यानंतर तो पुण्याला जाण्यासाठी कॅबची वाट बघत होता. मंत्रमुग्ध करणाऱ्या अतिशय गोड आवाजाने राजचे लक्ष वेधून घेतले. राजने वळून बघितले, कुणीही दिसत नव्हते परंतु गोड आवाजातील बोलणे मात्र चालूच होते. फोनवर बोलता बोलता भल्या मोठ्या पिलर मागून ती बाहेर आली आणि राज तिच्याकडे बघतच राहिला.


गव्हाळ वर्ण, सडपातळ बांधा, मध्यम ऊंची, लाल रंगाचा स्लीवलेस टॉप, काळ्या रंगाची पॅन्ट, खांद्यावर विसावलेले मोकळे केस आणि हाय हिल्स. निव्वळ अप्रतिम सौंदर्य! तिची कॅब आली आणि ती निघून गेली. केवळ काही क्षणांचे दर्शन पण राज पुरता घायाळ झाला. 


राजला पुण्याला येऊन दोन दिवस झालेत. तो अजिबात घराबाहेर पडला नाही आणि अगदी कमी बोलत होता. राज तु बेचैन दिसतोस, जरा बाहेर जाऊन ये, तेवढाच फ्रेश होशील, आई म्हणाली. रीनाचा दोनदा फोन आला तिला भेटून ये. केवळ आईच्या आग्रहास्तव राज रीनाकडे जायला तयार झाला.


रीनाने राजचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. राजने आणलेला परफ्युम तिला खूप आवडला. रीना बरोबर गप्पा रंगल्या नी तेवढ्यात तीचा फोन वाजला. त्यानंतर रीना फोनवर बराच वेळ बोलत होती. राजला फोनवरील मधुर आवाज ओळखीचा वाटला. कालची ती गोड गळ्याची सौंदर्यवतीच तर नसेल ना? 


रीना, कोणाचा फोन होता? किती गोड आवाज आहे ना? राजने अधीरतेने विचारले. 

माझ्या मैत्रिणीचा, नेहाचा फोन होता. 

काय करते नेहा? राजचा पुढचा प्रश्न. 

नेहा डॉक्टर आहे.

तिचे क्लिनिक कुठे आहे? राजने विचारले. 

डेक्कनला, पण राज तुला तिच्याकडे नाही जाता येणार, ती चाइल्ड स्पेशालिस्ट आहे, रीना म्हणाली. राज क्या बात है? जरा जास्तच चौकशी करतोस तू. 

छे, छे, मी अगदी सहजच विचारले.


दुसऱ्या दिवशी राजने नेहाचे डेक्कन वरील क्लिनिक शोधले. नेहा तर चाईल्ड स्पेशालिस्ट, मग तिच्याकडे कसे जायचे? राज विचार करत होता. सिग्नलपाशी मोगऱ्याचा गजरा विकणारा लहान मुलगा पाय घसरून पडला आणि त्याच्या पायाला थोडेसे खरचटले. किती लागले याला! राज जोरात म्हणाला. गरीब बिचारा, याला मी डॉक्टरकडे घेऊन जातो म्हणत त्या मुलाला राजने पटकन उचलून घेतले, एक गजरा खिशात टाकला आणि त्या लहानग्याला डॉक्टर नेहाकडे घेऊन गेला. 


याला खूप लागलंय, डॉक्टर आहेत ना? आत कुणी पेशंट नाही ना? याला आत घेऊन जाऊ का? एका दमात राजने रिसेप्शनिस्टला विचारले. त्या मुलाला उचलून, पळत पळत आल्याने राजला धाप लागली होती. होकार मिळताच राज डॉक्टरांच्या केबिनमध्ये शिरला आणि काय तो सुखद धक्का! एअरपोर्टवर दिसलेली ती सुंदर तरुणीच डॉक्टर नेहा होती. 


मलमपट्टी करता करता, अहो, किती थोडंसं लागलंय, एवढी धावपळ करायची काय गरज होती? डॉक्टरांनी आश्चर्याने विचारले. प्रथम त्या मुलाच्या साध्या कपड्यांकडे बघत आणि त्यानंतर ब्रॅण्डेड कपडे घातलेल्या आणि रुबाबदार पर्सनॅलिटी असलेल्या राजकडे पाहत डॉक्टरांनी विचारले, हा तुमचा कोण? म्हटलं तर कोणीही नाही, राज म्हणाला. मग याला तुम्ही माझ्याकडे का आणले? नाईलाजाने राजला "तुम्हाला भेटायचे होते म्हणून" हे सत्य लपवावे लागले. अहो, सिग्नलपाशी मी याला पडताना बघितले आणि घाईघाईने तुमच्याकडे घेऊन आलो. 


थॅंक्स डॅाक्टर. फी किती द्यायची? राजने विचारले. अहो तुम्ही एवढी समाजसेवा करतात मग काय पैसे घेणार मी तुमच्याकडून? डॉक्टर, फी नाही पण निदान हा मोगऱ्याचा गजरा तरी घ्या, धैर्य एकवटून राज म्हणाला. गजरा घेताना दोघांची दृष्टादृष्ट झाली आणि दोघेही गोड लाजलेत.


डॉक्टर एक सांगू? राजने विचारले. बोला बोला काय सांगायचे ते सांगून टाका, नेहा म्हणाली. तुम्ही डॉक्टर होण्यापेक्षा गायिका बनायला हवे होते, तुमचा आवाज खूपच गोड आहे, राज म्हणाला. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट्स. मला वरदही नेहमी हेच म्हणत असतो, नेहा म्हणाली. 


हा वरद कोण? राजचा प्रश्न ओठातल्या ओठात. नवरा की मित्र की प्रियकर? इतकी सुंदर नी डॅाक्टर मुलगी एकटी असणं केवळ अशक्यच. राज अस्वस्थ झाला. 


राज, उद्या माझ्या वाढदिवसानिमित्त मी एक पार्टी अॅरेंज केली आहे. तू नक्की ये, रीनाचा फोन आला. तू परवा चौकशी करत होतास ना ती डॉक्टर नेहा देखील येणार आहे. परवा जरा जास्तच चौकशी करत होतास ना, उद्या ओळख करून देईन तीच्याशी. ऐक, नेहा निळी साडी नेसणार आहे, तू पण बघ तुझ्याकडे निळा शर्ट असल्यास तोच घाल. 


राज बराच आधी पोहोचला निळा शर्ट आणि राखाडी कलरची पॅंट घालून. डेकोरेशन करायला त्याने अगदी मनापासून मदत केली. सर्व काही अगदी व्यवस्थित आणि मनासारखे झाले होते. हळूहळू पाहुणे आणि मित्र मंडळी यायला सुरुवात झाली. नेहा कधी येणार, राज तीला भेटायला आतुर झाला होता.


सर तुम्ही इकडे कसे? मोठ्या आश्चर्याने निळी साडी परिधान करून आलेल्या नेहाने विचारले. म्हणजे तुम्ही एकमेकांना ओळखतात? रीनाने आश्चर्याने विचारले. 

रीना, अगं परवाच तर हे एका लहान मुलाला घेऊन आले होते माझ्या क्लिनिकमध्ये, तेव्हा भेटलो. राज आणि लहान मुलाला घेऊन? रीनाला आश्चर्य वाटले आणि तितकेच राजच्या चालाखीचे कौतुकही. साध्या भोळ्या राजमधील "छुपा रुस्तम" पाहून रीनाला नवल वाटले.


ऑफिसच्या मित्रांच्या स्वागतासाठी रीना पुढे गेली. 


डॉक्टर, वरद सर आले नाहीत? राजने विचारले. वरद दोन वर्षांपासून दिल्लीला राहतो, नेहाने सांगितले. सर तिथे एकटेच राहतात? राजने आश्चर्याने विचारले. हो, तो आय स्पेशालिस्ट आहे आणि त्याचे लहानसे हॅास्पिटल आहे तिथे.


काय राज? मला सांगितले सुध्दा नाहीस, नेहाला भेटल्याचे. मी सांगणारच होतो असे म्हणताना राज लाजला. वरद आणि नेहा एकत्र का राहत नाहीत? राजने विचारले. अरे व्वा, खूपच माहिती आहे तुला नेहाची! काय चाललंय मनात? नेहा आवडलेली दिसते. पण हा वरद कोण? असेच ना. काळजी करू नकोस, वरद हा नेहाचा मोठा भाऊ आहे.


पार्टी छान रंगली, रीनाने राजला गाणे म्हणण्याचा आग्रह केला. राजचे गाणे सर्वांना आवडले. वन्स मोर, वन्स मोर मागणी आली. वन्स मोर ऐवजी वन मोर असे म्हणत राजने एक द्वंद्व गीत सादर केले, नेहाच्या मदतीने. नेहा नाही म्हणत असताना देखील राजने तिचा हात धरून तिला स्टेजवर आणले. नेहा आणि राजची केमिस्ट्री खूपच छान जमली. मॅचिंग कपडे, मघुर आवाज, रुबाबदार पर्सनॅलिटी. साहजिकच दोघेही कार्यक्रमाचा केंद्रबिंदू बनलेत.


कार्यक्रम सुरू असताना नेहाने रीनाला एकटीला गाठून विचारले, हा राज तुझा कोण? कधी पासून ओळखतेस तू राजला? खूप जवळचा मित्र का? फक्त मित्रच ना? नेहा, तुला सिग्नल क्लियर आहे, राज माझा मावस भाऊ आहे. नेहाचा तणाव नाहीसा झाला. दोघीही खळखळून हसल्यात. 


तेव्हढ्यात राज तेथे आला. नेहा, राजने अमेरिकेत एम टेक केलेय आणि तिथेच मोठ्या कंपनीत काम करतो. रीना म्हणाली. मी तिथे खुप मोठ्या कंपनीत, अगदी छोट्या पोस्टवर आहे, सुटी घेऊन आलोय. नेहाला राजचा मोकळेपणा आवडला.


आताशा नेहा आणि राजचे रीनाकडे येणे वाढले, बऱ्याचदा दोघे एकाच वेळी येऊ लागले. हा योगायोग होता की जाणून बुजून आणि ठरवून केलेला प्रयास? 

आता "अहो" संबोधनाची जागा "ए" ने घेतली होती. 


वाढदिवसाच्या दिवशी काढलेले फोटो छान आलेत आणि त्यातल्या त्यात नेहा आणि राजचे फोटो अप्रतिम आलेत. त्यांच्या गाण्याची व्हिडिओ क्लिप रीनाने तिच्या काही मित्रांना पाठविली.


रीना, अगं माझी परत जाण्याची वेळ जवळ आली. मला परवा परत अमेरिकेला जायचेय. राजच्या आवाजात नाराजी होती. 


राज, नेहात जीव अडकतोय, खरे ना? रीनाने विचारले.

मुक्काम थोडे दिवस वाढव, रीना म्हणाली. 

अगं पण आई-बाबांना काय कारण सांगू? राजने विचारले. एवढेच ना? रीनाकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर होते. 


पुढच्या आठवड्यात माझ्या बाबांचा ६१ वा वाढदिवस साजरा करायचा आहे त्यासाठी म्हणून थांब आणि त्या कार्यक्रमाचे नियोजन तु आणि नेहाने करायचे. कशी वाटली माझी आयडिया?


राज आणि नेहा मोठ्या उत्साहाने कामाला लागले आणि रीनाच्या बाबांच्या वाढदिवसाचा प्रोग्रॅम त्यांनी अतिशय व्यवस्थित प्लॅन केला. एकत्र येणे वाढले, मैत्री वाढली, प्रेम वाढले, भेटीतील गोडवा वाढला. द्वंद्व गीताची तयारी करण्यासाठी म्हणून दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले. गरजेपेक्षा जरा जास्तच प्रॅक्टिस केली त्यांनी. प्रोग्रॅम छान झाला, दोघांच्या गीतांना उपस्थितांकडुन खूप दाद मिळाली.


दोन दिवसांनी राजला परत जायचे होते. रीनाने राज आणि नेहाला तिच्या घरी बोलावले. आज राज आणि नेहा फारशा चांगल्या मूडमध्ये नव्हते. रीनाला बाय करून दोघेही जायला निघाले. राज मला तुझ्याशी काही बोलायचे आहे असे म्हणत रीनाने राजला थांबविले. नेहा अगं लिफ्टने जा, जिना नुकताच धुतला आहे. तु हाय हिल्स वापरतेस, निसटलीस तर तुझ्यासाठी डॅाक्टर शोधायला लागेल. नेहा ग्राउंड फ्लोअरला लिफ्ट मधून बाहेर पडणार तोच एका अवाढव्य इसमाने तीला लिफ्टमध्ये ढकलत, लिफ्टमध्ये प्रवेश केला. 


अहो काही मॅनर्स? नेहा चिडून म्हणाली. पहिल्या मजल्यावर बाहेर पडताना त्याने नेहालाही बाहेर ओढले. नेहा, घाबरू नकोस. तुला मी रीनाच्या घरीच नेतो आहे. तुम्ही मला आणि रीनाला कसे ओळखतात? नेहाला उत्तर मिळण्याच्या आतच ती आणि तो इसम रीनाच्या घरात शिरलेत.


या सर, या ना, तुमचे पाय माझ्या घराला लागलेत हे माझे भाग्यच! म्हणात रीनाने त्याचे स्वागत केले. हे सर मोठे प्रोड्युसर आहेत, तुमच्या गाण्याची व्हिडिओ क्लिप मी त्यांना पाठविली होती. तुमच्या द्वंद्व गीतांचा अल्बम त्यांना काढायचा आहे. त्यासंदर्भातच मी त्यांना येथे बोलावले आहे, रीनाने सांगितले.


राज , नेहा तुम्ही आज आणि उद्या प्रॅक्टिस करा, नंतर आपण तीन दिवस उटीला शुटींग करु. प्रोड्युसर साहेब शूटिंगचे डिटेल्स सांगत होते. हे सर्व शक्य होईल जर राज आणि नेहा तुम्ही वेळ देऊ शकाल. काय राज आणि नेहा चालेल ना? 

राज कुणाशीतरी फोनवर बोलत होता.

आम्हा दोघांनाही चालेल नेहा म्हणाली. 

नेहा, अगं राजशी बोलुन ठरवू या, रीना म्हणाली. 

मी मेसेज करुन त्याला विचारले, आम्हा दोघांनाही चालेल नेहा म्हणाली. 

नेहा तू आणि राजने मला चक्क "बायपास" केले, रीना लटक्या रागाने म्हणाली.


सर, शूटिंगला मी देखील येणार रीना म्हणाली. 

रीना, मी या दोघांचे तिकीट बुक करायला आत्ताच सांगितले. म्हणजे सर, तुम्हीही मला "बायपास" केले, इति रीना.


आमच्याशी न बोलता तू अल्बम प्लॅन केलास म्हणजे "बायपास" ची सुरुवात तूच तर केलीस रीना, नेहा आणि राज एक सुरात म्हणालेत. 


आपण सर्वच "बायपास" झालोत. मग अल्बमला नांव " बायपास" द्यायचे का? प्रोड्यूसर साहेबांनी विचारले. मनसोक्त हसत आणि टाळ्या वाजवत सर्वांनी होकार दिला.


मी अजून दोन आठवडे पुण्याला राहणार आहे असे राज सांगेल तेव्हा नक्कीच आई-बाबांना आश्चर्य वाटुन त्यांनाही "बायपास" झाल्याचे जाणवेल. 


वरदला काहीच न सांगता नेहाची एवढी मोठी झेप! "बायपास" केल्याचा राग विसरून तो नक्कीच नेहाचे अभिनंदन करेल कारण नेहाने गायन करावे अशी त्याचीही इच्छा होती.


या बायपासच्या चक्रात राज आणि नेहाने एकमेकांना केव्हा "पास" केले ते कोणालाही समजले नाही.


दिलीप कजगांवकर, पुणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.