सकाळी आठचा सुमार, राज आणि त्याचा मित्र राजच्या बंगल्याच्या गार्डनमध्ये चहा आणि नाश्ता घेत होते.
राज साहेब येऊ का मी? ट्रॅक पॅंट, हाफ बाह्यांचा टी-शर्ट, पायात चपला, डोक्यावर टोपी आणि हातात सायकल घेऊन आलेला माणूस विचारत होता.
तु फुलविक्या ना? ये रे, जरा नाईलाजानेच राज म्हणाला. २०-२२ वर्षांनी उगवलास, शाळेत असताना होतास बिलकुल तसाच आहेस मित्रा, काहीच फरक पडलेला नाही. अजुनही फुले विकतोस का? हुशार होतास लेका, पुढे शिकलास की नाही? काय काम काढलंस?
फुलविक्या उभाच होता, त्याला बस असंही राज म्हणाला नाही. तो काही बोलणार तेवढ्यात राज म्हणाला, मित्रा, मी जरा घाई घाईत आहे, तु पुढच्या आठवड्यात ये. फुलविक्याला चहा, नाश्ताच काय पण साधे पाणीही न देता राजने त्याची बोळवण केली.
वडिलांच्या निधनानंतर शाळेचा अध्यक्ष झालेल्या राजला शाळेत खुप सुधारणा करायच्या होत्या आणि आतातर शाळेच्या नुतनीकरणासाठी मोठा देणगीदार लाभला होता, न्युयॉर्कस्थित विकीच्या रूपाने. थोडी थोडकी नव्हे, चक्क ५१ लाखांची देणगी आज ११ वाजताच्या कार्यक्रमात विकी देणार होता.
कडक इस्त्रीचे कपडे आणि ब्लेझर घालून राज निघणार तेवढ्यात नेहा, म्हणजे राजच्या मामेबहीणीचा फोन आला. पप्पांना खुप त्रास होतोय, दादा गाडी घेऊन लगेच ये ना प्लीज, त्यांना दवाखान्यात न्यावे लागेल.
नेहा, मला खूप महत्त्वाच्या कार्यक्रमाला जायचे आहे, मी कार्यक्रम संपल्यावर फोन करतो. एक सामाजिक जबाबदारी पेलण्यासाठी राजने कौटुंबिक जबाबदारी झटकली होती.
राज पोहोचला त्यावेळी हॅाल उपस्थितांनी भरला होता. प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी राज आणि निवडक मंडळी प्रवेशद्वारापाशी येऊन थांबली.
पांढरा शुभ्र शर्ट, निळी पॅंट, चकचकीत बुट घालून आलिशान गाडी चालवत आलेल्या तरूणाचे सर्वांनी स्वागत केले. मी विकीचा मित्र, स्वागताने संकोचलेल्या तरूणाने सांगितले. विकीला अचानक एके ठिकाणी जावे लागल्याने तो कार्यक्रमाला येऊ शकणार नाही. विकीच्या खुप शुभेच्छा आणि हा चेक मी आणला आहे.
कार्यक्रम एकंदर छान झाला परंतु विकीची अनुपस्थिती जाणवली. राजने विकीच्या दातृत्वाचे मनापासून कौतुक केले.
कार्यक्रम संपल्यावर नेहाला फोन करून राज दवाखान्यात पोहोचला. मामा कसे आहेत? किती पैसे भरायचे? राजने अधिरतेने विचारले. पप्पा आता स्टेबल आहेत. दादा, त्यांचे नशीब थोर. तुझ्याशी बोलले आणि तितक्यात त्यांचा एक विद्यार्थी आला. त्यानेच येथे आणले आणि १५ हजार रुपयेही भरलेत. डॉक्टरांनी आता धोका नाही असे सांगितल्यावरच तो गेला.
तेवढ्यात राजचा फोन वाजला. अस्खलित इंग्लिश, बोलणारा तो दुसरा तिसरा कोणी नव्हे तर विकीच होता. रीटर्न फ्लाईट साठी तो मुंबईला निघाला होता. सर आपली भेट झाली नाही निदान दर्शन व्हावे म्हणून व्हिडिओ कॅाल करू का? राजने विचारले. चालेल, मीच करतो ५ मिनिटांत विकी म्हणाला.
नेहा ताई, सर कसे आहेत आता? सरांना अगदी वेळेत दवाखान्यात आणणाऱ्या आणि आता अतिशय आस्थेने चौकशी करणाऱ्या सरांच्या विद्यार्थ्याचा फोन नेहाने राजला दिला.
मित्रा, तू अगदी ऐनवेळी केलेल्या मदतीमुळे सरांची तब्येत ठीक आहे, राजने सांगितले. साहेब, त्यात विशेष ते काय? मी सरांसाठी काहीतरी करू शकलो हे माझे भाग्यच! राजला आवाज ओळखीचा वाटला. हो तो फुलविक्याच होता. फुलविक्या, तु येतोस का? तुझे १५ हजार मी परत करतो, शिवाय १ हजार जास्त देतो बक्षिस म्हणून. अरे तुझ्यासाठी खूप मोठी रक्कम असणार ही. तु ये, मी वाट पाहतो. मला एक खूप महत्त्वाचा फोन येणार आहे असे म्हणत राजने फोन डिस्कनेक्ट केला.
तेवढ्यात विकीचा व्हिडिओ कॉल आला. विकी सर, तुम्ही कॅमेरा अॅडजेस्ट करा ना, तुमचा चेहरा दिसत नाहीये, राज म्हणाला. पुढच्या क्षणी मात्र राज चक्क क्लीन बोल्ड झाला. कधी काळचा तो फुलविक्याच, विकी होता. गरीब फुलविक्या ते न्युयॉर्कचा विकी, अविश्वसनीय प्रगती!
न बोलवता घरी आलेल्या विकीला राजने ओळखले नव्हते. आदरातिथ्य न करताच त्याची बोळवण केली होती. स्वतःच्या कौतुक सोहळ्यापेक्षा सरांना दवाखान्यात नेण्यास प्राधान्य देणाऱ्या त्या दानशूराला राज म्हणाला होता, तुझे १५ हजार परत करतो, शिवाय १ हजार बक्षीसही देतो. तुझ्यासाठी नक्कीच खूप मोठी रक्कम असणार ही. राजला स्वतःचीच कीव आली.
-दिलीप कजगांवकर, पुणे
