सर तुम्ही कसे आहात? मी तुमचा विद्यार्थी राज बोलतोय, ओळखलंत ना मला?
राज, अरे मी बाई बोलतेय. सरांचा नुकताच डोळा लागलाय, प्रवासाने थोडे थकलेत रे ते.
राज म्हणजे तू जोगेश्वरी मंदिराच्या समोर राहायचास बरोबर ना? बाईंनी विचारले.
हो बाई आणि इतके आठवतेय तुम्हाला? राजने आश्चर्याने विचारले. खूप कष्ट करून शिक्षण घेतलेस रे तू. मला आठवतेय ना, स्टेशनवर ओझी वहायचास तु पण शिकण्याची मोठी जिद्द. बरा आहेस ना? काय करतोस तू? बाईंनी मोठ्या कुतूहलाने विचारले.
बाई अजूनही मी ओझीच वाहतो, परंतु खांद्यावर नाही तर गाडीतून. माझा ट्रान्सपोर्टचा बिझिनेस आहे, राजने सांगितले.
बाई तुमच्या आवाजात मला काळजी दिसते, सर्व ठीक तर आहे ना? राजने विचारले.
तुम्हा विद्यार्थ्यांपासून काय लपवायचे? बाई बोलत्या झाल्या.
शाळेच्या नवीन बिल्डिंगसाठी डोनेशन जमवायचे म्हणून तुझे सर पुण्याला गेले होते. एका दिवसात एक लाख रुपये त्यांनी त्यांच्या माजी विद्यार्थ्यांकडून जमा केलेत. शाळेच्या सेक्रेटरी साहेबांना फोन करून तसे कळवले आणि सर पुण्याहून तळेगावला आलेत. हे घे एक लाख रुपयांचे पाकीट, असे म्हणत सरांनी कोटाच्या खिशात हात घातला परंतु पाकीट खिशात नव्हते. कुणीतरी चोरले असावे किंवा कुठेतरी पाकीट पडले असावे. सरांनी इकडे, तिकडे, पिशवीमध्ये बघितले परंतु पाकीट मिळाले नाही.
राजने बाईंना थांबविण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांचे बोलणे अव्याहत चालूच होते. सेक्रेटरी साहेबांचा अभिनंदनाचा फोन आला, परवा संध्याकाळी सरांचा शाळेत सत्कार ठेवलाय. हरवलेले पैसे परत मिळावे असे वाटते पण ते अशक्यच आहे ना? आता एक लाख रुपये भरून द्यायचे. केवढी मोठी गोष्ट आहे रे आमच्यासाठी? माझ्या आजारपणामुळे होते नव्हते ते सर्व पैसे संपले. केवळ दोन मार्ग आम्हाला दिसले. माझे मंगळसूत्र, नाही तर यांचे गोल्ड मेडल विकून पैसे उभे करायचेत. सरांनी काळजावर दगड ठेवून त्यांचे गोल्ड मेडल विकायचे ठरविले.
एकदा गोल्ड मेडल विकून पैसे मिळाले आणि ते सेक्रेटरी साहेबांकडे दिले की हे निश्चिंत होतील. बाईंनी मन मोकळे केले आणि त्यानंतरच त्या थांबल्या. हे सर्व ऐकताना राजचे डोळे पाणावलेत.
कुणाशी बोलतेस? बाहेर येत सरांनी विचारले. तुमचा माजी विद्यार्थी राजचा फोन आहे त्याला तुमच्याशी बोलायचं आहे म्हणत, बाईंनी फोन सरांकडे दिला.
जणू काहीच झाले नाही अशा अविर्भावात सर राजशी बोलत होते. बाईंशी बोलला नसता तर राजला सरांची परिस्थिती आणि मनस्थिती समजली देखील नसती.
चितळे सर, वय वर्षे ७०, एक निस्वार्थी, सेवा निवृत्त हाडाचे शिक्षक. मुलांवर चीडण्यापेक्षा प्रेम करणारे, कधीही छडी न वापरणारे, हसत खेळत शिकविणारे, विद्यार्थ्यांचे लाडके सर.
सर मी फोन अशासाठी केला की मला पुण्यात एका रिक्षामध्ये एक पाकीट मिळाले आणि त्यावर "चितळे सर" असे लिहिले होते. अक्षर ओळखीचे वाटले म्हणून मी ते पाकीट उचलले आणि रिक्षावाल्याला विचारले की माझ्या आधी रिक्षात कोण बसले होते? त्याने केलेले वर्णन तुमच्याशी मिळते जुळते असल्याने मला खात्री झाली की ते पाकीट तुमचेच असणार. मी तुम्हाला फोन केला पण तुमचा फोन बंद आहे असा मेसेज येत होता.
कामे आटोपून मी घरी आलो, पाकीट उघडले तर त्यात मला एक लाख रुपये मिळाले म्हणून मी तुम्हाला परत फोन केला आणि बाईंनी फोन उचलला.
परमेश्वरा तुझे अस्तित्व आहे रे बाबा! सर गहीवरून म्हणालेत.
सर तुमचे अकाऊंट डिटेल्स द्या, मी तुम्हाला पैसे ट्रान्सफर करतो. सरांच्या मनावरील ताण नाहीसा झाला. पैसे हरवल्याच्या कटू धक्क्यापेक्षा पैसे मिळाल्याचा धक्का हवाहवासा आणि सुखकर होता.
सरांनी राजला अकाउंट डिटेल्स दिलेत आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की राजने पैसे त्यांना ट्रान्सफर करण्याऐवजी जर शाळेच्या सेक्रेटरी साहेबांना ट्रान्सफर केलेत तर अकाउंटमधून पैसे काढून, ते सांभाळून शाळेत नेण्याची आपली जबाबदारी कमी होईल. राज, तू सेक्रेटरी साहेबांनाच पैसे ट्रान्सफर करशील का? मी त्यांचे अकाउंट डिटेल्स तुला देतो.
दुसऱ्या दिवशी सरांच्या मोबाईलच्या स्क्रीनवर मेसेज झळकला. तुम्ही जमवलेले एक लाख रुपये आणि माझे अकरा हजार असे एक लाख, अकरा हजार रुपये मी सेक्रेटरी साहेबांना पाठविताना नमूद केले की हे चितळे सरांनी जमविलेले पैसे आहेत.
राज, अरे तुझे आभार कसे मानु? असे चितळे सर लिहीत असतानाच राजचा पुढचा मेसेज आला. मी शिकत असताना माझी परिस्थिती खूप गरिबीची होती, तुम्ही शिकवणीची फी न घेता मला शिकविले, मला वेळोवेळी मदत केली. सर, मी आज जो काही आहे तो फक्त तुमच्यामुळेच. सर, गुरुदक्षिणा म्हणून मी तुम्हाला एक छोटीशी भेट पाठवित आहे. प्लीज त्याचा स्वीकार करा. पुढच्याच क्षणी सरांच्या अकाउंटमध्ये दोन लाख रुपये जमा झालेत.
म्हणतात ना,
आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे.
- दिलीप कजगांवकर, पुणे
