भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृतीची संवाहक असते. भाषा समाजातच जन्मतात आणि समाजाच्या निर्मितीत मोठी भूमिका निभावतात. मराठी भाषेने महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील अनेक महापुरूषांच्या विचारांना अभिव्यक्ती देऊन सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य केले आहे, असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे काढले.
भारतीय भाषांमध्ये कधीही वैरभाव नव्हता. येथील सर्व भाषांनी एकमेकांना समृद्ध केले असून भाषिक भेदांपासून दूर राहून भाषा संवर्धित करणे ही सर्वांची सामुहिक जबाबदारी असल्याचे आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केले.
नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर, मावळते अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे, कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे , कोषाध्यक्ष प्रकाश पागे, संमेलनाचे निमंत्रक संजय नहार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
साहित्य संमेलनासाठी आलेल्या सर्वांचे मराठीत स्वागत करून प्रधानमंत्री म्हणाले, मराठी साहित्य संमेलन एका भाषेपुरते मर्यादित नाही. त्यास स्वातंत्र्य संग्रामाचा गंध असून तो एक मोठा सांस्कृतिक वारसा आहे. 1878 पासून देशातील अनेक महान व्यक्तींनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. या परंपरेशी जोडेले जाण्याचा मला विशेष आनंद आहे. जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून होत असलेले संमेलनाचे आयोजन प्रशंसनीय आहे. ज्ञानेश्वरांनी 'माझ्या मराठाचि बोलू कौतुके, अमृताते पैजा जिंके' असे म्हटले आहे. मराठी भाषेवर माझे खूप प्रेम आहे. मराठी भाषा शिकण्याचे प्रयत्न मी निरंतर करीत आहे. अशा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम पूर्ण करण्याची संधी मिळाल्याचे मला मोठे समाधान आहे, असेही श्री मोदी यांनी सांगितले.
