संसाररूपी गाडा इकडे तिकडे न वळता एकदा सरळ रेषेत आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू लागला ना.. की मग या संसार वेलीवर कळ्या आणि फुलं, मुलं आणि मुलींच्या रूपात तुमच्या आमच्या घरट्यात जन्म घेतात. ' मुलं म्हणजे, देवाघरची फुलं! ' कोणाच्या घरट्यात, अंगणात किती येतील; आणि रंगरूप, सुंदर, कुरूप किंवा कोणी व्यंग घेऊन जन्माला येतात. पण आपण म्हणतो ना, 'देवाची करणी आणि नारळात पाणी'... त्याप्रमाणे ही निसर्गाची देणगी आहे, असेच म्हणावे लागेल.
निरागस, निरूपद्रवी आणि निर्मळ मनाची असलेली ही मुले, निष्कलंक असतात. मऊ लोण्याच्या गोळ्या प्रमाणे अथवा कुंभार जसा मातीच्या गोळ्याला आकार देऊन, त्यापासून हव्या त्या आकाराच्या मातीच्या भांड्यांची निर्मिती करतो. त्याप्रमाणे आई-वडिलांच्या, आजी आजोबांच्या, आणि इतर नात्यांमध्ये चांगले संस्कार घडून मुले मोठी होतात. बालपणी त्यांना खुशाल अंगणात, पटांगणात खेळू द्यावे. निसर्ग, नातीगोती यांची ओळख करून द्यावी. 'शरीर सुदृढ तर मन सुदृढ'... या उक्तीप्रमाणे त्यांच्यामध्ये व्यायामाची आवड निर्माण करणे गरजेचे आहे. पाठांतर, अक्षर लेखन, चित्रकला, नृत्य, गायन, वादन यांची आवड त्यांना आयुष्यभर साथ देईल. पण ही मडकी व्यवस्थित भाजली गेली आहेत का? त्यांनी चांगला आकार घेतला आहे का? यावर तुम्हालाच नजर ठेवावी लागेल. पुढे आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याला थंडगार पाणी त्यांनीच द्यायला हवे ना? आणि मग आपापल्या व्यवसायातील व नोकरीतील अमूल्य वेळ काढून केलेले आपले हे संस्कारच घडवतील, ही चांगली नाती आणि पुढील पिढ्या.
शिक्षण मुलांना घडवते. शिक्षक मुलांवर संस्कार करत असतात. तेवढेच संस्कार निसर्ग सुद्धा मुलांवर करत असतो. ' निसर्ग हा गुरू आहे '. तो लहरी सुद्धा आहे. दररोज होणाऱ्या निसर्गातील असंख्य बदलांमुळे तो आपल्याला सुख, समाधान ही देतो आणि आपल्या जीवनात हानीही पोहचवतो. एकंदर काय तर… निसर्ग आपल्याला जगायचं कसं तेच शिकवत असतो. निसर्गात ही मुले वाढत असतात. पावसाळ्यातील हिरवाईने बदललेले जग त्यांना वेळोवेळी सहली काढून न्याहाळू द्या. निरनिराळ्या प्रकारची फुले, पाने, पशु, पक्षी, झाडे, वेली तर दाखवाच.. पण ऊन, वारा, पाऊस, डोंगर, दऱ्या, नद्या, सूर्य, चंद्र, चांदण्या आणि त्यांच्यात दररोज होणारे बदलही मोठ्या हौसेने दाखवा. मोठ्या माणसांनी जसे खुप मोठे उन्हाळे, पावसाळे पाहिले असतात. अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांवरही, मोठ्या माणसांसारखे हे ऋतू, संस्कार करत असतात. पण मग शाळेला जायचा कंटाळा आल्यावर, मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या गीताप्रमाणे तीही म्हणणारच की...
_सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ?_
_शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ?_
घर ही संस्कार रुपी शाळाच आहे. मुलांना घडवणारे पालक, शिक्षक संस्कार तर चांगलेच देणार ना? कुणाच्या घरात कसा नारळ निघेल हे लगेच तर काही सांगता येत नाही. कालांतराने हळूहळू कळत जाते. ‘ज्याच्या घरी चांगली मुले जन्माला आली त्याला नारळ पावला आणि ज्याच्या घरी दुर्जन, व्यसनी मुले जन्माला आली त्यांचा नारळ नासका निघाला,’ असेच म्हणावे लागेल.
या संस्कार शाळेच्या घडणीतून तयार झालेली मुले-मुली मोठी होऊन संस्कारित घरे स्थापित करतात. विविध व्यवसाय, सरकार मधील विविध पदे आणि सरकारे, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शास्त्रज्ञ इत्यादी उच्च उच्च पदांवर काम करतात. हिमालयाच्या सर्वोच्च शिखरावर, तसेच चंद्रावर देखील आपल्या देशाचा ध्वज फडकवतात. आपल्या देशाच्या व अन्य देशांच्या पंतप्रधान पदी पोहचतात. ‘अमुक एका क्षेत्रातच कामगिरी कर,’ असा धाक अथवा बळजबरी त्यांच्यावर नकोच. त्यांच्या शिक्षणासाठी व व्यवसायासाठी आता आकाश मोकळे आणि मोठे झालेले असते. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे आणि मताप्रमाणे भरारी घेऊ द्यावी. फक्त संस्कार रुपी शिस्त त्यांच्या पाठीशी कायम उभी ठेवावी.
आता तर संगीत, सिनेमा, नाटक अशी किती तरी क्षेत्रे त्यांच्या साठी खुली आहेत. अहो...'काही नाही शिकला तर घराची शेती तर आहेच की...त्याच्यासाठी'. असे शेतकरी म्हणतात. शेतीला सुद्धा कोणी कमी लेखू नये. शेतीमध्ये राहून सुद्धा कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारे शेतकरी आपण आजूबाजूला पाहतो. अंग मेहनतीचे काम करताना खरा घाम येतो, आणि शेतकऱ्यांचे शरीर शेवटपर्यंत आजारांपासून लांब असते. शिक्षण, काम कोणत्याही क्षेत्रात चालेल फक्त आपण मुलांना व्यसनापासून लांब राहायला शिकवायला हवे. सर्वोत्कृष्ट शिक्षणाबरोबरच अभंग, श्लोक, भजन आणि वारकरी प्रबोधन यांनी सुद्धा मुलांवर चांगले संस्कार केले जातात. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशाचे पिढ्यान् पिढ्या चालत आलेले हे संस्कार नक्कीच चांगले आहेत.
जीवनाच्या एखाद्या सायंकाळी हे संस्कार आपल्याला आनंद देवून जातात. जुने दिवस आणि बालपण आपल्याला आठवते. आई, वडील व आजी, आजोबांनी केलेले पारंपारिक संस्कार फलद्रूप होतात. त्या वेळचेच दिवस चांगले वाटतात, आणि मग माणूस म्हणतो..
' लहानपण देगा देवा…'!!
©️®️
🦚 *डॉ. प्रविण डुंबरे* 🦚
ओतूर, शिवजन्मभूमी (जुन्नर) पुणे
९७६६५५०६४३
