मुंबईहून पुण्याला धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेस मध्ये ए सी कोच मधील विंडोसिटवर एक अतिशय देखणी मुलगी बसली होती. गुड मॉर्निंग शिल्पा, कशी आहेस तू? असे म्हणत तिच्या बाजूला एक व्यक्ती येऊन बसली.
गोरापान वर्ण, मध्यम उंची, डोक्यावर तुरळक केसांची वस्ती, छानसा टी-शर्ट, जीन्स, आकर्षक घड्याळ आणि चष्मा, एकंदरीत प्रभावी व्यक्तिमत्व.
अंकल मी तुम्हाला ओळखलं नाही, आपण याआधी कधी भेटलो आहोत का? शिल्पाने विचारले.
शिल्पा, अगं मी तरी तुला कुठे ओळखतो.
तर मग तुम्हाला माझे नांव कसे समजले? शिल्पाचा प्रश्न मनातल्या मनात. रिझर्वेशन चार्टवर त्यांनी माझं नांव बघितले असावे, शिल्पाने स्वतःचे समाधान करून घेतले.
गाडीने कल्याण स्टेशन सोडलं, नाश्त्याची ऑर्डर घेणाऱ्या मुलाने विचारले, सर, तुम्हाला नाश्ता हवा आहे का? आम्हा दोघांनाही नाश्ता नको पण थोड्या वेळाने चहा द्या. न विचारताच, अंकलने घेतलेला निर्णय शिल्पाला अजिबात रुचला नाही, तिला त्यांचा रागच आला.
अंकलने नाश्त्याचा डबा उघडताच उपम्याचा सुगंध दरवळला. शिल्पा अगं तुही डबा काढ. एकत्र खाऊया. तुझी कंपनी आवडेल मला. शिल्पाने नाराजीनेच डबा काढला.
काय पोहे काय?
अंकल, खरंच मला माहित नाही. शिल्पाने डबा उघडला आणि काय आश्चर्य, त्यात पोहेच होते.
काकूंनी केलेत का?
कालच मीना काकू आल्यात आणि आज अगदी सकाळी लवकर उठून त्यांनी मोठ्या प्रेमाने नाश्ता बनवला.
डब्यात पोहे आहेत आणि ते काकूंनी केलेत, कसे समजले अंकलला? परत एकदा शिल्पाचा प्रश्न मनातल्या मनात.
साधारणतः आपल्याकडे नाश्त्याला उपमा किंवा पोहे बनवतात आणि महिलांना काकू किंवा मावशी असे संबोधतात. शिल्पाने स्वतःची समजूत करून घेतली.
गाडीने लोणावळा पार केलं. शिल्पा परागचा मेसेज बघण्यात मग्न होती.
शिल्पा तू कुठे उतरणार, शिवाजीनगरला ना?
शिल्पाने मान डोलावली.
तिथून तू घरी कशी जाणार? कोणी मित्र घ्यायला येणार असेल.
अंकलना कसं समजले मला कोणीतरी घ्यायला येणार म्हणून? पुन्हा एकदा शिल्पाचा प्रश्न मनातल्या मनात. अच्छा म्हणजे दुसऱ्यांचा मोबाईल चोरून बघण्यात अंकल पटाईत दिसतात.
शिल्पा मी माझी कार शिवाजीनगर स्टेशनला पार्क केली आहे. तू असं कर माझ्याबरोबर ये, मी तुला घरी सोडेन.
नको नको अंकल मला घ्यायला माझा मित्र येणार आहे.
शिल्पा तुझ्या मित्राला तुला घ्यायला येणं जमणार नाही. तू माझ्याबरोबरच ये. अंकलचा सूर आग्रही होता. अंकलच्या बळजबरीचा तीला राग आला.
आणि काय आश्चर्य! पुढच्याच क्षणी शिल्पाच्या मोबाईलवर परागचा मेसेज आला. शिल्पा, सॉरी मला यायला जमणार नाही. शिल्पा आश्चर्याने अवाक झाली.
माझे नांव, डब्यात पोहे, पोहे काकूंनी बनवलेत, पराग घ्यायला येणार आणि त्यानंतर त्याला यायला जमणार नाही कसे काय समजले अंकलला?
शिल्पाने परागला फोन करायचा प्रयत्न केला परंतु फोन लागला नाही. दर दोन मिनिटांनी शिल्पा बघत होती परागचा काही मेसेज आहे का. तेवढ्यात अंकल म्हणालेत शिल्पा, तुला तुझ्या मित्राचा फोन किंवा मेसेज येणार नाही. त्याचा फोन तुला येईल तो आज नव्हे उद्याच.
शिल्पा आणि अंकल दोघेही शिवाजीनगर स्टेशनला उतरलेत. अंकल मी रिक्षा घेईन. तुम्ही माझ्यासाठी उगीचच कशाला त्रास करून घेतात?
अगं, तुला मित्रमंडळला जायचं आणि मला सहकार नगरला, म्हणजे ऑन द वे. त्यात कसला त्रास?
मी मित्रमंडळला राहते हे अंकलला कसे समजले शिल्पाचा प्रश्न पुन्हा एकदा मनातल्या मनात.
थोड्याशा नाईलाजानेच शिल्पा अंकलच्या गाडीत बसली. अंकल अतिशय सराईतपणे गाडी चालवत होते. गाडी घरापाशी पोहोचल्यावर, गाडीतून उतरताना शिल्पाने अंकालकडे व्हिजिटिंग कार्ड मागितले. कधी जमलं तर मी तुम्हाला फोन करून भेटायला येईन.
शिल्पाला व्हिजिटींग कार्ड देत अंकल म्हणालेत शिल्पा, बहुतेक यापुढे आपली भेट होणार नाही.
अंकलला बाय करून शिल्पा घरात पोहोचली. दिवसभर परागचा ना फोन ना मेसेज. आज परागच्या गुड नाईट मेसेज किंवा फोन शिवाय शिल्पाला झोपायला लागले आणि सकाळी देखील परागचा गुड मॉर्निंग चा फोन न आल्यामुळे शिल्पाला उठायला बरीच उशीर झाला.
तुझ्या मित्राला तुला घ्यायला यायला जमणार नाही, आज त्याचा फोन किंवा मेसेज येणार नाही. त्याचा फोन उद्याच येईल असे अचूक सांगणाऱ्या अंकल आणि पराग यांचं काहीतरी नातं असावे असे शिल्पाला प्रकर्षाने वाटले.
तीने पर्स मधून अंकलचे व्हिजिटींग कार्ड काढले.
वामन जोशी,
नमन सदन,
सहकार नगर पुणे.
शिल्पाने अंकलला फोन केला परंतु फोन बंद असल्याचा मेसेज येत होता. पराग बद्दल माहिती काढायची तर अंकलला भेटणे आवश्यक होते, शिल्पा अंकलच्या घरी जायला निघाली. सहकारनगर आल्यावर शिल्पाने स्कुटीचा वेग कमी केला. तेवढ्यात एक कॉलेज कुमार लगबगीने पुढे आला.
तु कुणाचा पत्ता शोधतेस का?
हो मला "नमन सदन" ला जायचंय.
अच्छा म्हणजे वामन जोशींकडे का? त्याने विचारले. याला कसं माहित? शिल्पाचा प्रश्न मनातल्या मनात.
तू असं कर इथून सरळ पुढे जा आणि पहिल्याच चौकातून उजव्या अंगाला वळ, त्यानंतर थोडे पुढे गेल्यावर डाव्या अंगाला वळ. तिथून दुसराच बंगला "नमन सदन".
दोन मिनिटांतच शिल्पा "नमन सदन" या आलिशान बंगल्यापाशी पोहोचली. बंगल्यासमोर दोन महागड्या गाड्या उभ्या होत्या. तीने दारावरची बेल वाजवली. एका वयस्कर स्त्रीने दरवाजा उघडला. मला वामन जोशी सरांना भेटायचं, शिल्पाने सांगितलं.
चिराग, पराग अरे कोण आहे? तुम्ही यांना आत न्या. पराग आणि अंकलचे संबंध आता स्पष्टपणे जाणवू लागले होते. अंकल म्हणाले होते आपली भेट यापुढे बहुतेक होणार नाही आणि आता तर ती अंकलच्या घरी पोहोचली होती त्यांना भेटण्यासाठी.
एका तरुणाने शिल्पाला आतमध्ये नेले. अंकल बेडवर शांतपणे पडले होते. आज सकाळीच, अॅटॅकने. त्या तरुणाने सांगितले. अंकल आता या दुनियेत नव्हते. शिल्पाने वाकून अंकलला नमस्कार केला.
पराग काही दिसत नाही? शिल्पाने विचारले.
मीच पराग, वामन जोशींचा लहान मुलगा. सुटेल असे वाटणारा गुंता आता अजूनच वाढला होता. खिन्न मनाने शिल्पा घरी परतली.
रात्र झाली तरीही परागचा फोन आला नव्हता आणि आता तर बाराला फक्त दोनच मिनिटे बाकी होती. अंकलने सांगितलेल्या सर्व गोष्टी खऱ्या ठरल्या होत्या आणि अंकलने काल असेही सांगितले होते की परागचा फोन आज नाही उद्या येईल. म्हणजे आज फोन यायला हवा होता. काय आश्चर्य! पुढच्याच मिनिटाला फोन वाजला. हो फोन परागचाच होता.
काय रे कुठे होतास? घ्यायला का आला नाहीस? फोन का केला नाहीस? एखादा मेसेज सुद्धा केला नाहीस? एका दमात अनेक प्रश्न शिल्पाने विचारले आणि त्यानंतर कालचा रेल्वे मधील किस्सा तिने परागला सांगितला.
शिल्पा, तुला भेटलेले गृहस्थ वामन जोशी होते का? पराग तुला कसे कळले? शिल्पाचा प्रश्न आता मनातल्या मनात नव्हता तर तो तिने प्रत्यक्ष विचारला होता. पराग काही बोलणार तोच फोन डिस्कनेक्ट झाला. शिल्पाने बराच वेळ फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु फोन लागला नाही.
गुंता अजूनच वाढून, वामन जोशी प्रकरण आता समजण्याच्या पलीकडे गेलं होतं. शिल्पाला भीती वाटू लागली. बराच वेळ तिला झोप आली नाही, पहाटे पहाटे तीचा डोळा लागला नी तेवढ्यात फोन वाजला. फोन परागचा होता.
पराग, त्यांना तू ओळखतोस का? कधी पासून ओळखतोस? तुझे आणि त्यांचे काही नाते आहे का? काय नाते आहे? अनेक प्रश्न शिल्पाने विचारलेत.
शिल्पा, अगं वामन जोशींना कोण ओळखत नाही?
वामन जोशी म्हणजे अतिशय मनकवडे, प्रख्यात ज्योतिषी आणि फेस रीडर. बघता क्षणी तुमचे वर्तमान, भूत आणि भविष्य अचूक जाणणारे.
दोन दिवस अनुभवलेला विचीत्र गुंता एका क्षणात सुटला. अनपेक्षितपणे एका मोठ्या माणसाचा लाभलेला सहवास आणि त्यातूनच निर्माण झालेला गुंता शिल्पासाठी अविस्मरणीय ठरला.
-दिलीप कजगांवकर, पुणे
